संवाहनशास्त्र अर्थात मसाज! ( उदय निमकर ) आरोग्य रक्षणासाठी अत्यंत उपयुक्त असलेले मसाज अर्थात संवाहन शास्त्र. रोग बरे करण्यासाठी या मसाजाचा होणारा उपयोग आणि त्याच्या प्रकारांची माहिती.... ...... मसाज देण्याच्या अनेक पद्धती आहेत. निरनिराळ्या व्याधींवर निरनिराळ्या पद्धतींचा उपचार केला जातो. मसाज देताना स्नायूंवर हात सफाईदारपणे फिरावा- स्नायू नरम व्हावेत म्हणून अनेक प्रकारची तेले, अत्तरे, पावडरी यांचा उपयोग केला जातो. या वस्तूंना मसाजाची साधने म्हणतात. या साधनांचा औषधी गुणधर्मही व्याधींवर उपचार म्हणून फायदेशीर ठरतो. पद्धत (१) घर्षण (Rubbing) ज्या भागाला मसाज द्यावयाचा आहे, त्या भागावर हाताचा पंजा ठेवून, हाताचा अंगठा व तर्जनी किंवा अंगठा व चारही बोटे यांचा हलकेच दाब देऊन हळूहळू चोळावे, याला घर्षण पद्धत म्हणतात. दाब देताना अंगठ्याचे टोक किंवा बोटांची टोके यांचा वापर करू नये. साधारणपणे ३ ते ५ किलोग्रॅम एवढाच दाब द्यावा. या प्रकारच्या मसाजाने रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. थकलेले स्नायू उत्तेजित होतात. त्वचा व स्नायू यांना योग्य शारीरिक स्थिती (Tone) प्राप्त होते. हा सर्वसाधारण प्रकारचा मसाज आहे. पद्धत (२) चक्रगती (Circular Motion) - या पद्धतीत हाताचा तळवा किंवा बोटे यांचा उपयोग करून स्नायू हळूहळू आवळतात. असे करताना हात गोलाकार फिरवतात. या प्रकारच्या मसाजने स्नायूंचा थकवा नाहीसा होतो. स्नायूंची ताकद वाढते. स्नायू लवचिक होतात. कठीण, ताठरलेले खांद्याचे स्नायू, पाठीचे स्नायू नरम व सैल होतात. खांदे व मनगटे कार्यक्षम बनतात. पद्धत (३) चिमकुटे (Kneading) - अंगठा आणि तर्जनी किंवा मधले बोट किंवा चारही बोटांनी सांध्याच्या स्नायूंना चिमकुटे काढण्याची ही पद्धत आहे. या प्रकारच्या मसाजमुळे सांध्यातील द्रवपदार्थाचे विघटन होते आणि त्यातील घटकांचा समतोल साधला जातो. दोन हाडांच्या सांध्यांतील द्रवपदार्थ पातळ होऊन सांध्याच्या हालचाली सुरळीत होण्यासाठी या पद्धतीचा उपयोग होतो. स्नायूंचा बधिरपणा आणि कडकपणा कमी होतो. पद्धत (४) थापट्या (Tapping) - दोन्ही हातांच्या करंगळीखालच्या भागाने स्नायूंवर आळीपाळीने जलदगतीने थापट्या मारण्याची ही पद्धथ अतिताणामुळे कठीण झालेले स्नायू नरम करण्यास उपयोगी पडते. थापट्या हळूहळू (Lightly) हलक्‍या हाताने, पण जलद गतीने मारण्यात याव्यात. एका सेकंदात १३-१४ थापट्या मारता आल्यास चांगला गुण येतो. थापटीचा दाब १ किलोग्रॅम असावा. पद्धत (५) दाब (Pressure Method) - हाताचा पंजा आणि अंगठा किंवा चारही बोटे यांनी स्नायूंवर साधारणपणे ३ ते ५ किलोग्रॅम वजनापर्यंत ३ ते ५ सेकंद दाब देण्याच्या या पद्धतीस दाब पद्धत म्हणतात. अशा पद्धतीने दिलेला दाब हळूहळू वाढवून थोडा वेळ दाब तसाच ठेवून हळूहळू कमी करण्याचे कसब वापरावे. दाब पद्धत प्रत्यक्ष अनुभवानेच साध्य होऊ शकेल. पद्धत (६) बुक्के (Stroking/Hammering) - स्नायूंवर एका किंवा दोन्ही हातांनी बुक्के मारण्याच्या या पद्धतीने कडक झालेले स्नायू नरम होतात. ही पद्धत खेळाडूंना फार फायदेशीर आहे. पद्धत (७) पिळणे (Twisting) - हातांचे दंड, पायांच्या मांड्या, पोटऱ्या यावर दोन्ही हातांचे तळवे-एक उलट, एक सुलट ठेवून हलक्‍या हाताने स्नायूंवर फिरवावे. या मसाजच्या पद्धतीस पिळणे म्हणतात. या पद्धतीने रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. पद्धत (८) स्पंदन किंवा कंपन (Vibro Method) - हा मसाजचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. या पद्धतीत हाताचा अंगठा आणि बोटे एकदमच स्नायूंवर दाबून, स्पंदने निर्माण करून त्या स्पंदनांची लय वाढवायची असते. एका सेकंदाला ३०-४० स्पंदने निर्माण करून स्नायूंच्या वेदना कमी करता येतात. या प्रकारच्या मसाजने नसा आणि स्नायू यांची कार्यक्षमता वाढते व रक्ताभिसरण सुरळीत होते. उपचार मसाजचा उपचार मुख्यत- खांदेदुखी (फ्रोझन शोल्डर्स), पाठदुखी, मानेचे दुखणे (सर्व्हायकल स्पॉंडीलॉसिस), कंबरदुखी (स्लिप डिस्क), पक्षाघात (पॅरॅलिसिस) या व्याधींवर केला जातो. अगदी लहान अशक्त मुले, पोलिओ झालेली मुले, मानसिक ताणतणाव, डोकेदुखी, दाढदुखी, ऐकायला कमी येणे, अस्थमा, कमी रक्तदाब, जास्त रक्‍तदाब, झोप न येणे, वजन कमी करणे, डोळ्यांची निगा वगैरे अनेक व्याधींवर मसाजचे उपचार केले जातात. काही प्रमुख व्याधींवरील उपचारांची माहिती खाली दिली आहे. फ्रोझन शोल्डर्स लक्षणे - हा खांद्याचा वातव्याधी आहे. हा कोणत्याही वयाच्या स्त्री-पुरुषांना होऊ शकतो. हाताच्या सांध्यातील वंगण देणाऱ्या ग्रंथी अकार्यक्षम झाल्यास हात वर करणे अगर मागे नेणे शक्‍य होत नाही. खांद्याला सूज येते. ठणका मारतो. दुखऱ्या हाताच्या बाजूला झोपता येत नाही. थोडा धक्कासुद्धा सहन होत नाही. खांद्याच्या सांध्यातील वंगण देणाऱ्या ग्रंथी कठीण झाल्यास वंगण घट्ट होते. निडिंग पद्धतीने हळूवार संवाहन करावे. आठ सिटिंगनंतर सुधारणा दिसू लागेल. खांदा संपूर्ण बरा होईपर्यंत उपचार चालू ठेवावेत. खांद्याच्या हाडास मार लागल्यास हाड मोडेलच असे नाही. स्नायू दुखावतात. सूज येते. कमी झाल्यावर तिळाच्या तेलाने अगर चंदनाचे तेल वापरून हलक्‍या हाताने घर्षण पद्धतीचा मसाज द्यावा. स्कूटर अगर मोटारसायकल घसरून पडल्याने खांद्याचे हाड फ्रॅक्‍चर झाल्यास शस्त्रक्रिया करावी लागते. अशा वेळी स्नायूंचे टोनिंग वाढविण्यासाठी व बधिरपणा कमी करण्यासाठी ऍक्‍युपंक्‍चर करावे लागते. नंतर बदामाच्या तेलाने कंपन पद्धतीचा मसाज द्यावा लागते. पाठदुखी - बराच वेळ उजव्या किंवा डाव्या बाजूला नकळत झुकून बसल्याने किंवा पोक काढून बसल्याने पाठीच्या वरच्या भागातील स्नायूंवर ताण येतो. पाठ दुखते, बसणे अशक्‍य होते. उकळत्या गरम पाण्याने टर्कीश टॉवेलने मणक्‍याच्या बाजूचे स्टिफ झालेले स्नायू सुमारे १० मिनिटे शेकावे. काही वेळानंतर बर्फाच्या खड्याने मालीश करावे. स्नायू नरम पडल्यावर थोरॅसिस व्हर्टीब्री ऍडजस्ट करावे. हळूहळू १० ते १५ मिनिटे ताठ बसावे. थोडे थोडे चालणे सुरू करावे. सूर्यनमस्कार घालणेही उपयुक्त आहे. सर्व्हायकल स्पॉंडिलॉसिस (मानेचे दुखणे) - मान दुखण्याची अनेक कारणे आहेत. खाली मान घालून सतत वाचणे, लिहिणे यामुळे मानेच्या स्नायूंवर ताण पडल्याने मानेच्या मणक्‍यांना स्टिफनेस येतो. मानेच्या तिसऱ्या मणक्‍यात घट्टपणा असला तर दोन्ही हाताच्या दोन बोटांनी कंपन पद्धतीचा गोलाकार मसाज द्यावा. पाचव्या, सहाव्या मणक्‍यातील अंतर कमी असल्यास कौशल्यपूर्ण ताणून तीन बोटांनी हलक्‍या हातांनी दाब पद्धतीने मसाज द्यावा. स्टिफनेस कमी होतो. मानेच्या हालचाली पूर्ववत होतात. स्लिपडिस्क (कंबरदुखी) - काही वेळा पाय घसरून शरीराच्या पार्श्‍वभागावर पडायला होते. त्यावेळी पाठीचे मणके दुखावले जातात. वाकून जड वस्तू उचलायला गेले तरीही एकादे वेळी मणक्‍यातून कळा यायला लागतात. मसाजिस्टच्या सल्ल्याने शरीराची हालचाल करावी. झोपून उठताना डाव्या अगर उजव्या कुशीवर वळून उठावे. पॅरॅलिसिस (पक्षाघात) - ब्लडप्रेशर प्रमाणाबाहेर वाढले की मेंदूतील रक्तवाहिन्यांवर प्रचंड दाब येतो. त्यामुळे त्या तुटतात व मेंदूत रक्तस्राव सुरू होतो. मेंदूतील केंद्रे काम करीनाशी होतात. त्याचा परिणाम म्हणून शरीराची एक बाजू उजवी अथवा डावी कमजोर होते. लुळी पडते. हालचाल करणे जवळ जवळ अशक्‍य होते. अशा पेशंटवर ब्लडप्रेशर नॉर्मल आणण्यासाठी हॉस्पिटलमध्ये उपचार करावे लागतात. त्यानंतर डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार दोन ते तीन महिने कंपन पद्धतीने मसाज द्यावा लागतो. व्यायामही करून घ्यावा लागतो. अगदी लहान मुलांसाठी - आपल्याकडे मूल जन्मल्यानंतर ११ व्या दिवसापासून मुलाला मालीश करण्याची प्रथा आहे. याला अंगाला लावणे म्हणतात. दिवसांतून दोनदा मालीश केल्याने मुलाची त्वचा मऊ राहते. स्नायू बळकट होतात. मूल हालचाल करीत असल्याने त्याला थकवा येतो. तो मालीशमुळे नाहीसा होतो. मुलाला शांत झोप लागते. मुलाच्या शरीरातील उष्णता टिकवली जाते. रक्ताभिसरणक्रिया सुधारते. मुलाची व्यवस्थित वाढ होते. गर्भारपणी नीट काळजी घेतली नाही तर किंवा इतर नैसर्गिक कारणांनी मूल कमी वजनाचे जन्मते. सातोळे म्हणजे सातव्या महिन्यात जन्मलेले मूल कमी वजनाचे असते. (३ ते ४ पौंड). अशा मुलांच्या मेंदूची व शारीरिक वाढ मंद गतीने (डश्रुे) होते. सर्वसाधारण (छीोरश्र) म ुलापेक्षा ते अशक्त असते. त्याची पचनक्रिया मंद असते. अशा मुलाला घर्षण पद्धतीने हळूवार मसाज द्यावा. मूल अत्यंत नाजूक त्वचेचे असल्यामुळे अंगाला तेल लावणारी बाई जाणकार असावी. तिळाच्या अगर बदामाच्या तेलाचा वापर करावा. जोडीला कॅल्शियमयुक्त औषधे द्यावीत. रिकेट्‌स असलेल्या मुलांच्या पाठीच्या कण्याला व हातापायांना स्पंदन पद्धतीने मसाज द्यावा. मसाजसाठी कॉडलिव्हर ऑईल वापरावे. आयुर्वेदामधील महाभाष तेल किंवा बला तेलाच्या मालीशचा चांगला उपयोग होतो. या उपायाने मुलाची चांगली वाढ होते असा अनुभव आहे. लहान मुलांना २० ते २५ मिनिटांच्यावर मसाज देऊ नये. पोलियो (बालपक्षघात) - १ ते ५ वर्षापर्यंतच्या लहान मुलांना दोन-चार दिवस ३ ते ४ डिग्रीपर्यंत ताप येतो. तापाचे निदान होईपर्यंत व योग्य ते उपचार सुरू होईपर्यंत मुलाच्या शरीराची उजवी अगर डावी बाजू लुळी पडते. अशा मुलांच्या पाठीच्या कण्याला व कमजोर स्नायूंना हलक्‍या हाताने घर्षण पद्धतीने मसाज द्यावा. तिळाचे तेल अथवा नारायण तेल वापरावे. बरेच महिने मसाज चालू ठेवावा लागतो. लुळी पडलेली बाजू पूर्णपणे बरी होत नाही; परंतु बऱ्याच प्रमाणात सुधारणा होते. मानसिक ताणतणाव - राजकीय पुढारी, उद्योगपती, व्यवस्थापन प्रमुख, सचिव, बॅंक मॅनेजर्स वगैरे जबाबदारीच्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तींना कार्यक्षम कारभार चालवताना राज्याच्या, देशाच्या व संस्थेच्या हितासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतात व ते अंमलात आणावे लागतात. मनावर दडपण आल्याने शारीरिक स्वास्थ्य बिघडते. मेंदू विचार करून थकतो. मानसिक व शारीरिक दुबळेपणा जाणवू लागतो. पचनक्रियेवर परिणाम होतो. झोप येत नाही. स्वभावात चिडचीड येते. जरा काही मनाविरुद्ध झाले की राग येतो. पाठीच्या कण्याला गुलाब पाण्याने किंवा कोलन वॉटरने कंपन पद्धतीने मसाज द्यावा. या उपचाराने मेंदू शांत होण्यास मदत होते. झोप चांगली लागते. गुलाबाचे अगर चंदनाचे अत्तर बदामाच्या किंवा तिळाच्या तेलात मिसळून (१०० मि. - १ किलोग्रॅम या प्रमाणात) लावावे. डोक्‍याला मालीश करताना शुद्ध खोबरेल तेल अथवा ब्राह्मी, आवळा, जास्वंद तेल यांचा उपयोग करावा. मेंदूची थकणे - अति वाचनाने, बोलण्याने आणि अति विचार करण्यानेही मेंदूला थकवा येतो. डोके जड होते. डोक्‍याचा मागचा भाग दुखायला लागतो. काही सुचेनासे होते. विशेषत- राजकारणी, मुत्सद्दी, उद्योगपती, व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्ती, इंजिनियर्स, वरिष्ठ अधिकारी, प्रशासकीय अधिकारी अशा महत्त्वाच्या व्यक्‍तींना कामामुळे मानसिक थकवा येतो. कशातही उत्साह वाटत नाही. त्यांची कार्यक्षमता कमी होण्याची शक्‍यता असते. रक्तदाब वाढतो. पचनशक्ती मंदावते. यावर मसाजिस्टकडून हळूवार, हलक्‍या हातांनी सूक्ष्म कंपन पद्धतीने मोगरा, वाळा, गुलाब अशा थंड असणाऱ्या सुवासिक अत्तरमिश्रित तेलाने मसाज करून घेणे हा उत्तम उपचार आहे. मसाजिस्टकडून पाठीच्या मूलाधारचक्रापासून म्हणजे कानाच्या पाठीमागून कंबरेच्या कण्यापर्यंत मर्दन करून घ्यावे. सुमारे १५ मिनिटे मसाज द्यावा. स्त्रिया वेणी घालण्यापूर्वी डोक्‍यावरील केसांचा मधोमध भांग पाडतात, त्याप्रमाणे मध्य भागापासून दोन्ही हातांच्या बोटांच्या टोकांनी (अग्रभागांनी) दोन्ही बाजूंना कंपन पद्धतीने सुमारे १० मिनिटे मसाज द्यावा. मसाजसाठी खोबरेल, बदाम तेल, ब्राह्मी तेल वापरावे. दोन्ही हातांच्या अंगठ्यांनी तीन-चार वेळा मसाज द्यावा. कपालास्थी म्हणजे भुवयांच्या वर बोटे ठेवावीत आणि नाकास्थी म्हणजे डोळ्याखालची हाडे यांवर बोटाच्या टोकांनी तीन-चार वेळा मसाज द्यावा. अंगठ्याच्या मऊ भागाने हलका दाब द्यावा. मनगटाच्या गोल हाडांचा उपयोग करून मर्दन करावे. - उदय निमकर मसाजतज्ज्ञ, मुंबई.